शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

MPSC/UPSC चा मायाजाल.

MPSC/UPSC चं मायाजाल
===================

सध्या सोशल मीडियावर स्पर्धा परिक्षांच्या चिक्कार जाहिराती येतांना दिसतात. पास झालेले PSI/तहसीलदार वगैरे नविन अधिकारी मस्तपैकी मोटीवेशनल भाषण देऊन ते कसा खडतर प्रवास करून अधिकारी बनलेत हे सांगत असतात. असले जोश टॉक ऐकून दूर कुठेतरी एखाद्या खेड्यात बसून फेबूवर टिपी करणारा सामान्य विद्यार्थी अचानक अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहतो व कुठलीच पूर्व तयारी व कुवत याची चाचपणी न करता आई बापाना कर्ज काढायला लावून पुण्यात येऊन धडकतो. आयुष्यातील 3-4 वर्षाचा चुराड करून मग कधीतरी हा गावाकडचा मार्ग धरतो.

वरील प्रकरणात सर्वात जास्त अडकलेला तरूण हा बहुतांश मराठवाड्यातला दिसतो. त्याला मुख्य कारण स्थानिक पातळीवरील बेरोजगारी आहे. दुर्दैवाने क्लासेसवाले एक्कादुक्का मराठवाड्यातला अधिकारी हुडकून त्याच्याकडून भाषण ठोकून घेतात व फेबूवरून वायरल करतात. त्यामुळे किठलीही पुर्वतयारी वा कुवत नसलेले अनेक पोरं अचानक अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहू लागतात. मग पालकांच्या मागे भुणभुण लावतात. एका टप्यावर पालक बिचारे तयार होतात, कारण त्यांना वाटतं की पोरगं म्हणतय तर आपण का अडसर बनायचं. काढू थोडंफार कर्ज... नंतर हा अधिकारी बनला की फेडेलच. अशा प्रकारे मराठवाड्यातली हजारो मुलं दर वर्षी पुण्यात येऊन धडकतात. चांगला क्लास शोधून प्रवेश घेतात. रूमचा खर्च, मेसचा खर्च, क्लासची फीज व इतर खर्च हा सगळा भार तिकडे दूर शेतकरी बाप ऊचलत असतो. एक दोन वर्ष पुण्यात घालविल्यावर मग लक्षात येऊ लागतं की त्या अमूक एका "जोश टॉक"नी फसविले गेलो. कारण जोश टॉकनी फळ दाखवून ईकडे यायला भाग पाडलं पण त्या फळाचा पाठलाग करण्यासाठीची Test कोणती हे सांगीतलच नव्हतं. कोणत्या Ability चा absence चालणार नाही हेही सांगीतलं नव्हतं. कोणती बलस्थानं असाविच लागतात हे सुध्दा सांगीतलं नव्हतं. अशी लांबलचक लिस्ट दिवसा गणिक मेंदूत तयार होत जाते व एक दिवस परतीचा निर्णय घ्यायची वेळ येते. पण तोवर गरीब आईवडलांचा पैसा नासवलेला असतो. जेंव्हा ही पोरं परततात तेंव्हा ते पुरते खचून गेलेले असतात. हे सगळं UPSC/MPSC च्या वलयांकीत मार्केटींगचा परिणाम आहे.

क्लासेसचा धंदा वाढविण्यासाठी केली गेलेली मार्केटींग अनावश्य गर्दी खेचून आणते व त्यातून गरीब मुलं कुवती पलिकडचं स्वप्न पाहू लागतात. आई वडील कर्जबारी होवून पोरांना पुण्यात ठेवतात व दोन चार वर्षानी ही पोरं रित्या हातांनी हताश व निराश होवून गावाकडे परततात. या परतलेल्या पोरांचा Interview (मुलाखत) कधीच व कोणीच दाखवत नाही. ती जर दाखविली गेली व त्यांचा आकडा सामोर आणला गेला तर या धंद्याची काळी बाजू लोकांसमोर येईल. पण तसं करणार कोण?

MPSC चं जे वलय ऊभं केलं जातय ते थांबलं पाहिजे. ज्याला नैसर्गीकपणे तिकडचा ओढा असेल त्यांनी कुवतीची चाचपणी करून त्या क्षेत्रात जावं. जसं की रोज सलग 8 तास अभ्यास करण्याची तयारी, चांगली स्मरणशक्ती व घरचं आर्थिक गणित वगैरे. पण क्लासेसच्या मार्केटींगच्या भूलथापांना बळी पडून जी अनेक पोरं पुण्याकडे ओढली जातायेत ते Fair & Just नाही. ही एका प्रकारे त्या वर्गाची passive फसवणूक आहे जो या स्वप्नांचा हकदार नाही. कारण स्वप्नांना वास्तवाची जोड असेल तरच ती सिध्दीस जातात.

पुण्यात ओसंडून वाहणारे स्पर्धा परिक्षांचे क्लासेस मार्केटींगच्या बळावर 80% unfit पोरांना दारापर्यंत खेचून आणत आहेत व बक्कड पैसा कमवत आहेत. त्यांनाही माहीत असतं की येणारी बहुतांश पोरं अपात्र आहेत तरी पैसे कमविण्याच्या नादात या पोरांची पुढील दोन चार वर्षे बरबाद केली जातात.

मुलांनो,
मार्केटींगला बळी पडून स्पर्धा परिक्षांचा पाठलाग करणे सोडा. कारण दोन चार वर्षे गेल्यावर नैराश्यानी घेरून परत येणा-यांची संख्या पाहता हे स्पष्ट दिसतय की धंदा करणारे क्लासवाले कुवत नसलेल्या मुलांना मोहात पाडून गल्ला भरतायेत. तुम्ही सावध व्हा.

सगळा विचार करूनच स्पर्धा परिक्षांच्या वाटेनी जा. कारण MPSC/UPSC एक मायाजाल आहे.